एका बंद खोलीत घडणार्या ह्या चित्रपटाची पटकथा गणितीय संज्ञांभोवती गुंफलेली आहे. सुरुवातीला एक कुट प्रश्न काही लोकांना सोडविण्यासाठी दिला जातो , या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणार्या चार गणित तज्ञांना पुढील चर्चेसाठी आणि अधिक अवघड अश्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बोलविले जाते. त्यांना वेळ आणि ठिकाण कळविले जाते, त्यांची ओळख लपविण्यासाठी त्यांना टोपणनावे (चार महान गणिततज्ञांची नावे ) दिली जातात आणि मोबाईल फोन न आणण्यास सांगितले जाते.ही चार पात्रे एका जुन्या घरात एका प्रशस्त खोलीत (निर्धरीत ठिकाणी) पोहचतात. थोड्या वेळाने तेथे आणखी एक गणिततज्ञ येतो आणि स्वतःची फर्मॅट अशी ओळख करून देतो. परंतु जेवण उरकल्यावर अचानक एक फोन येतो आणि त्याला जावे लागते.
त्यानंतर थोड्या वेळाने ही चारपात्रे (पास्कल,गॅलोईस,हील्बर्ट आणि ओलिव्हा )पुन्हा त्या खोलीत एकत्र येतात, आणि तेथे असलेल्या PDA सिस्टमवर एक मेसेज येतो. त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक मिनिटाचा वेळ दिला जातो , इतर तिघे प्रश्नाची उकल करत असताना पास्कलच्या लक्षात येते की उत्तर देण्यास विलंब केल्यास त्या खोलीचा आकार बदलत आहे !
आता चौघेही त्या खोलीत अडकले आहेत आणि बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येणार्या कोड्यांची उत्तरे देणे. जसा जसा वेळ जातो खोलीचा आकार कमी कमी होत जातो. पास्कल व गोलाईस या निर्णयाप्रत येतात की मोठे Poseidon hydraulic presses वापरुन खोलीचा आकार बदलत आहे आणि लवकरच तो एका छोट्या लिफ्ट एवढा होईल.
येण्यारया प्रत्येक नवीन प्रश्नानंतर संशयाची सुई एका पात्राकडे फिरते आणि चारही पात्रांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो. काही वेळातच खोलीतील वातावरण संशय, गूढ , भीती आणि रहस्याने भरून जाते.जवळपास शक्य असेल तेथे दिग्दर्शकाने गणितीय संदर्भ लावला आहे. त्या खोलीमधील वस्तूंचा चांगला वापर केला आहे. ८० मिनिटांचा हा चित्रपट आपणास खिळवून ठेवतो. परंतु यामधील कोडी त्यामानाने खूपच सोपी वाटतात, तरीसुद्धा थरार अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा असाच आहे .
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा