शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

डाउनफॉल (२००४ जर्मन)

Downfall (2004) 

Der Untergang (original title)

नाझी  हुकुमशहा हिटलरच्या आयुष्याचा शेवट कसा झाला ? याचे वास्तववादी चित्रण हेच या चित्रपटाचे वैशिष्ठ्य  !

कथानकाची सुरुवात होते ती  एका दृश्याने , 1942 च्या पावसाळ्यात प्रशियात  पूर्व  आघाडीवर हिटलरच्या सेक्रेटरीच्या  निवडीचा प्रसंग आहे , काही तरुण स्त्रिया त्याच्या बंकर कडे जात आहेत , त्यातील एकीची निवड होणार आहे , सर्वांशी ओळख करून घेतल्यानंतर (शुद्ध जर्मन वंशाच्या ) ट्राउडल  युंगची  सेक्रेटरीपदी  हिटलर नेमणूक करतो .

यानंतरची कथा आहे  ती , युंगच्या नजरेतून  हिटलरचे शेवटचे दहा दिवस , हिटलर चा मुक्काम आहे तो बर्लिन मधील एका  बंकर मध्ये , येथेच  त्याचे मुख्यालय, संपर्कयंत्रणा आणि सर्व काही .... पूर्वेकडून  रेड आर्मी चाल करून येत आहे तर पश्चिमेकडून मित्र राष्ट्रांच्या  फौजा बर्लिनवर आगेकूच करत आहेत, हिटलरच्या भोवती असणारे नाझी अधिकारी गोन्धळले आहेत, आता  पराभव निश्चित आहे आणि शरणागती  पत्करण्यात सामंजस्य  आहे , मानणारा  एक गट  तर , नाझीवादाशी  एकनिष्ठ आणि  अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार  करणारा दुसरा  गट , यातच चुकीच्या बातम्या आणि अफवांची भर पडत आहे.

आता  दोन्ही  बाजूंनी बर्लिनमध्ये जोरदार चकमकी  सुरु आहेत , महायुद्धाचा अंत जवळ आला आहे ,परंतु अजूनही हिटलरला आपल्या व्यूहनीतीबद्दल दुर्दम्य  आशावाद आहे. अजूनही सर्व काही संपले नाही  अशी त्याची खात्री आहे. अनेक हिटलरनिष्ठ त्याची साथ सोडत आहेत, त्यांचा बदला घेण्यास सांगत आहे . त्यातून अगदी हिटलरचे नातेवाईकही सुटले नाहीत.

चित्रपटाची दुसरी एक बाजू आहे, अनेक नाझी अधिकारी विनाश जवळ आला असूनही चंगळवाद करत आहे. हिटलरची आज्ञा नाकारणाऱ्या सैनिक व अधिकाऱ्यांवर मृत्युदंडाची कारवाई सुरु आहे. बरीचशी  कागदपत्रे  आणि ऐतिहासिक दस्तऐवज नष्ट करणाच्या आज्ञा सैनिक पाळत आहेत. बरेचजण शत्रूच्या हाती पडण्यापेक्षा  मृत्यूला जवळ करत आहेत, त्यासाठी आत्महत्येचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. आता काही तास उरले आहेत , हिटलर त्याच्या स्वप्नातील जर्मन  साम्राज्याच्या  ब्लू -प्रिंट समोर उभा राहून खंत व्यक्त करत आहे . आपल्यानंतर आपल्या वंशाचे काय होईल? आपली संस्कृती , वंश त्याला ज्युंपासून दूर ठेवायचा आहे, स्वतःची अगतिकता सांगत आहे. 

हिटलर आपल्या प्रेयसीशी (इवा ब्राऊन ) विवाह करतो, त्यानंतर ते दोघे आत्महत्या करतात  आणि,
त्यानंतर आत्महत्यांचे सत्र त्याच्या अनुयायांमध्ये सुरु होते. यानंतर शरणागतीची घोषणा होते बर्लिनमध्ये रेड आर्मी आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा आनंदोत्सव साजरा करत आहेत. संपूर्ण बर्लिनमध्ये बेचिराख इमारती, युद्धासामाग्रीचे  सांगाडे, छिन्न  मृतदेह यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यानू त्यातून इवा कशीबशी पळून जाण्यात यशस्वी होते.

चित्रपटातील  काही दृश्ये भयानक वास्तव दर्शवितात, काही किशोरवयीन मुलांना  हिटलरच्या हस्ते शौर्यापदके देऊन युद्धास प्रेरित केले जात आहे, जोसेफ गोएबल्सची* पत्नी आपल्या  सहा मुलांना झोपेत साइनाइडच्या गोळ्या देवून  मृत्युशय्येवर नेत आहे .

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या विषयावर निःपक्ष चित्रपट बनविण्यात आला. हिटलरची  भूमिका  ब्रुनो गांझ या अभिनेत्याने सार्थ निभावली आहे. दिग्दर्शकाचे कौशल्य वादातीत आहे, चित्रपट अडीच तासांसाठी आपल्याला 1945च्या बर्लिन मध्ये घेवून जातो , बारीकसारीक तपशील आणि संदर्भ वापरून कथानकाला योग्य न्याय दिला गेला आहे. जसे की विमानांचा बॉम्बवर्षाव  आणि  तोफांचा आवाज यातील फरक युन्गने बंकरमधून ओळखणे. हिटलर आणि प्रमुख अधिकारी बंकरमध्ये असताना बाहेर आघाडीवर होणारी जवानांची ओढाताण आणि हिंसाचारामध्ये भरडली जाणारी दिशाहीन जनता. चित्रपट हिटलरवर किंवा नाझीवादावर कोणतेही भाष्य करत नाही फक्त दर्शवितो ते केवळ वास्तव. युद्धाचा थरार आणि युरोप पादाक्रांत करूनही खचलेला हिटलर , यांसाठी चित्रपट पहावा.


*जोसेफ गोएबल्स हा हिटलरचा सल्लागार आणि निष्ठावान अनुयायी होता.


दिग्दर्शक : ऑलीव्हर हिर्षबीगल
याओशिम फेस्टच्या "इनसाईड हिटलर्स बंकर" या पुस्तकावर आधारीत
भूमिका:
हिटलर : ब्रुनो गांझ

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

दि फर्माट्स रूम (२००७ स्पॅनिश )


Fermat's Room (2007) 

La habitación de Fermat (original title)

 

    एका बंद खोलीत घडणार्‍या ह्या चित्रपटाची पटकथा गणितीय संज्ञांभोवती गुंफलेली आहे. सुरुवातीला एक कुट प्रश्न काही लोकांना सोडविण्यासाठी दिला जातो , या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणार्‍या चार गणित तज्ञांना पुढील चर्चेसाठी आणि अधिक अवघड अश्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बोलविले जाते. त्यांना वेळ आणि ठिकाण कळविले जाते, त्यांची ओळख लपविण्यासाठी त्यांना टोपणनावे (चार महान गणिततज्ञांची नावे ) दिली जातात आणि मोबाईल फोन न आणण्यास सांगितले जाते.ही चार पात्रे एका जुन्या घरात एका प्रशस्त खोलीत (निर्धरीत ठिकाणी) पोहचतात. थोड्या वेळाने तेथे  आणखी एक गणिततज्ञ येतो आणि स्वतःची फर्मॅट अशी ओळख करून देतो.  परंतु जेवण उरकल्यावर अचानक एक फोन येतो आणि त्याला जावे लागते.

     

   त्यानंतर थोड्या वेळाने ही चारपात्रे (पास्कल,गॅलोईस,हील्बर्ट आणि ओलिव्हा )पुन्हा त्या खोलीत एकत्र येतात,  आणि तेथे असलेल्या PDA सिस्टमवर एक मेसेज येतो. त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक मिनिटाचा वेळ दिला जातो , इतर तिघे प्रश्नाची उकल करत असताना पास्कलच्या लक्षात येते की उत्तर देण्यास विलंब केल्यास त्या खोलीचा आकार बदलत आहे !  

         

       आता चौघेही त्या खोलीत अडकले आहेत आणि बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येणार्‍या कोड्यांची उत्तरे देणे. जसा जसा वेळ जातो खोलीचा आकार कमी कमी होत जातो. पास्कल व गोलाईस या निर्णयाप्रत येतात की मोठे  Poseidon hydraulic presses  वापरुन खोलीचा आकार बदलत आहे आणि लवकरच तो एका छोट्या लिफ्ट एवढा होईल.

 

        

     येण्यारया प्रत्येक नवीन प्रश्नानंतर संशयाची सुई एका पात्राकडे फिरते आणि चारही  पात्रांचा  जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो.  काही वेळातच खोलीतील वातावरण संशय, गूढ , भीती आणि रहस्याने भरून जाते.जवळपास शक्य असेल तेथे दिग्दर्शकाने गणितीय संदर्भ लावला आहे. त्या खोलीमधील वस्तूंचा चांगला वापर केला आहे. ८० मिनिटांचा हा चित्रपट आपणास खिळवून ठेवतो. परंतु यामधील कोडी त्यामानाने खूपच सोपी वाटतात, तरीसुद्धा थरार अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा असाच आहे .